हिंगोली - लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण २८ उमेदवार आहेत. सुभाष बापुराव वानखेडे हे काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, त्यांच्या विरोधातचं सुभाष वानखेडे नावाचे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यामुळे याही निवडणुकीत आघाडीचे उमेदवार असलेले सुभाष वानखेडे यांना नावाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे सांगण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे याही लोकसभा निवडणुकीत सुभाष वानखेडे यांच्या विरोधात सुभाष वानखेडे या नावाचे ५ उमेदवार रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीत २८ उमेदवार असल्याने २ मतदान यंत्र असणार आहेत. सोबतच दिव्यांग, गर्भवती, महिला उमेदवारासाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. विरोधकांकडून मुद्दाम सुभाष वानखडे नावाचे उमेदवार उभे करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.
विशेष आघाडीचे उमेदवार असलेल्या सुभाष वानखेडे यांच्या विरोधात असलेले ५ उमेदवारही निवडणूक हमखास जिंकू असा दावा करीत आहेत. त्यामुळे निश्चितच याही निवडणुकीत सुभाष वानखेडे यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसचे सुभाष बापूराव वानखेडे यांच्यासह सुभाष काशीबा वानखेडे, सुभाष मारोती वानखेडे, सुभाष परसराम वानखेडे, सुभाष नागोराव वानखेडे या नावाचे उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या निवडणुकीत मतदान यंत्रावर निवडणूक चिन्हासमोर उमेदवारांचे छायाचित्र लावले जाणार आहे.