हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील आरटी येथे हिंगोली मार्गे येणाऱ्या बसवर अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना आज घडली. यामध्ये बसच्या दोन्ही बाजूच्या काचा फुटल्या असून याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कळमनुरी तालुक्यातील बाळापूर येथून एक बस हिंगोली मार्गे आठ प्रवाशांना घेऊन निघाली होती. आरटी फाट्यावर बस येताच काही युवकांनी आरडाओरड करत बसवर दगडफेक केली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेने प्रवासी चांगलेच हादरून गेले होते. अगोदर कोरोनामुळे संपूर्ण वाहतूक सेवाही पूर्णपणे बंद होती. अशा परिस्थितीत लालपरीदेखील जागेवरच ठप्प होती. नुकतीच ही लालपरी रस्त्यावर धावायला लागल्याने प्रवाशांनी काही प्रमाणात सुटकेचा श्वास सोडला. तोच ही घटना घडल्याने पुन्हा एकदा प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सदरील बसही कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.