हिंगोली - कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे अतिशय कठीण झाले आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव थांबवण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र, घरकाम करून जीवन जगणार्या कुटुंबावर आता खरोखरच उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. घरात खायला काहीच नसल्याने, एक दिवस आड चूल पेटवीत आहोत. दोन-दोन घास भरवरत कसतरी पोरांना जगवत असल्याची खंत एका महिलेने व्यक्त केली.
कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत आणखी भर पडत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे दिवसेंदिवस सर्वसामान्यांचे भयंकर हाल होत आहेत. हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबा समोर जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगोली शहरातील इंदिरा नगर भागातील अनेक निराधार महिला, कुणाच्या तरी घरी घरकाम, धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करत होत्या. मात्र, कोरोनामुळे त्या कोणाच्याच घरी जाऊन काम करु शकत नाहीत. त्यामुळे अशा अनेक कुटुंबांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. सध्या त्यांच्या घरातील सर्व अन्न धान्य संपले असून, काही जणांकडे तर शिधापत्रकही नाही. त्यामुळे धान्य मिळत नाही. कोणी दोन चपात्याचा डबा कधीतरी पाठवतो. त्यातील दोनदोन घास मुलांना भरवून कसतरी जगतोय, असे सांगत महिलेने आपली व्यथा मांडली.
मतदानाच्या वेळी घरोघरी फेरफटका मारणारे नगरसेवक आता या गोरगरिबांकडे फिरकूनही पाहत नसल्याची खंत या घरकाम करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली आहे. गरिबांना घरपोच धान्य पोहोचू म्हणणार सरकार साधे वळून ही पाहत नाही. यामुळे उपाशी तापाशी दिवस ढकलण्याची वेळ येत आहे. अनेक जण मदत करण्यासाठी सरसावले असले तरी काही गरजवंतांना तर ही मदत पोहोचल नसल्याचे ही समोरे आले आहे.
आता केवळ आमचा नगर पालिकेवरच विश्वास आहे. तेच आमच काही तरी करू शकतील, असा विश्वास या महिलांनी व्यक्त केला आहे. आता खरोखरच नगरपालिका या हातावर पोट असलेल्या कुटुंबासाठी धावून जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - कोरोनाची भीती : निर्जंतुकीकरण करुन घेण्यासाठी ग्रामस्थांनी लावली रांग