हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी हिंगोली प्रशासनास प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी 12 आणि शनिवारी पुन्हा 6 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णापैकी रिसाला बाजार भागातील असून, याचे वय 76 वर्ष आहे. या रुग्णाला कोरोनाचा लक्षणे आढळून आल्याने या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाचा बाहेर गावावरून येण्याचा कोणताही पूर्व इतिहास नसल्याचे, प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच सेनगाव तालुक्यातील मकोडी या गावातील एका 25 वर्षीय महिलेला ताप व पोटात दुखत असल्याने, जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, महिलेला कोरोना सारखी लक्षणे जाणवत असल्यामुळे चाचण करण्यात आली. महिलेचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
वसमत येथील कोरोना सेंटर अंतर्गत एकूण चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एक 27 वर्षीय व्यक्ती हा हैदराबादवरून वसमत येथे अंत्यविधीसाठी आला होता. तर दुसरा 30 वर्षीय व्यक्ती हा भारतीय लष्करामध्ये जवान असून, वसमत तालुक्यातील रिधोरा या गावी नागालँड येथून परतलेला आहे. तसेच वसमत तालुक्यातील टाकळगाव येथे मुंबईहून परतलेल्या दोन महिलांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला मुंबई येथील विठ्ठलवाडी येथून परतलेल्या आहेत.
शनिवारी 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 295वर पोहोचली आहे. त्यापैकी 248 रुग्ण हे बरे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी देण्यात आली आहे. विविध कोरोना केअर सेंटर तसेच कोरोना वार्डमध्ये 47 रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.
न्यायालय परिसरात ही उडाली खळबळ -
हिंगोली येथील न्यायालयासमोर असलेल्या एका हॉटेल चालकाला कोरण्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी येणाऱ्या वकिलासह पक्षकारांमध्ये मोठे वादळ निर्माण झाले आहे. या भागात दिवसभर पक्षकार तसेच विविध नागरिक कामानिमित्त येतात वकिलाची प्रतीक्षा करण्यासाठी ते हॉटेलमध्ये चहा नाष्टा करतात. मात्र, आता या हॉटेल चालकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे हॉटेलमध्ये चहा-नाष्टा केलेल्या प्रत्येकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता या हॉटेल चालकांच्या किती जण संपर्कात आले असावेत? ही मोठी चिंतेची बाब आहे.