हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'फिजिकल डिस्टनस' पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे एका दूध विक्रेत्याने ग्राहकांना दूध विक्री करण्यासाठी नळीचा आधार घेतला आहे. तर पैसे घेण्यासाठी स्वतंत्र बॉक्स ठेवला आहे. त्यामुळे दूध खरेदी करताना कोणी कोणाच्या अजिबात संपर्कात येत नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खळबळ उडाली आहे. हिंगोली येथे 91 कोरोनाबाधित रुग्णाची संख्या झालेली असल्याने, प्रशासन गतिमान झाले आहे. अशाच परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात राबणाऱ्या एका परिचरिकेला ही कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकामध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. रुग्णालयात उपचार करण्यासाठी देखील कोणी धाव घेत नाहीत. शहर देखील संपुर्ण सील करण्यात आले आहे. सद्या सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे.
तर 'फिजिकल डिस्टन्स' ठेवण्यासाठी हिंगोली शहरातील विविध दूध विक्रेते विविध शक्कल लढवत आहेत. ग्राहकांमध्ये अंतर राहावे यासाठी स्टील पाईपच्या आधारे दूध विक्री केली जात आहे. तसेच काही दूध विक्रेते लाकडाच्या सहाय्याने फिजिकल डिस्टन्स ठेवत ग्राहकांना बाटलीमध्ये दूध देत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील बेलवाडी येथील पशुपालक बालाजी मांडगे यांच्या कडे 45 म्हैस आहेत. त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळ 70 ते 80 लिटर दूध निघते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल बंद आहेत. त्यामुळे दुध विक्री करण्याची मोठी पंचायत निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणात दूध वाया जात आहे. मात्र, फिजिकल डिस्टन्स ठेवत जेवढे शक्य आहे तेवढे विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दूध विक्रेते बालाजी मांडगे यांनी सांगितले. या दूध विक्रेत्या बरोबरच शहरातील इतरही दुकानदारांनी ग्राहकामध्ये अंतर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंडे आजमावले आहेत.