हिंगोली - विदर्भातील पंढरी अशी ओळख असलेल्या शेगाव येथून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी डिग्रस कऱ्हाळे येथे पोहोचली. जागोजागी रांगोळी, पुष्पगुच्छ व रस्त्याची सजावट करत डीग्रसकरांनी दिंडीचे जंगी स्वागत केले. मात्र 52 वर्षाच्या परंपरेला लागले गालबोट लागले. दिंडीत सहभागी झालेल्या दहा ते बारा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली.
दरवर्षी डिग्रसकर गजानन महाराजांच्या दिंडीची आतुरतेने प्रतीक्षा करतात. पालखी येण्याचा दिवस म्हणजे या गावासाठी एक पर्वणीच असतो. पालखी येण्याच्या अगोदरच्या दिवशी गावात स्वच्छता केली जाते. एवढेच नव्हे, तर लेकीबाळी देखील या दिवसानिमित्त आवर्जून आपल्या माहेरी येतात. पालखी येणार्या मार्गाने गावात जागोजागी रांगोळ्या सडी-सारवण करून भाविक-भक्त पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाले. विशेष म्हणजे दोन वर्षापासून स्वच्छतेची काळजी घेतली जाते. जराही कचरा दिसू नये, म्हणून मशिनच्या साह्याने पालखी येणारा मार्ग स्वच्छ केला जातो. पालखी गावांमध्ये दाखल होताच भाविक भक्त 'श्री' ला पावसासाठी साकडे घालत असल्याचे पहावयास मिळाले.
जागोजागी पालखीचे दर्शन घेण्यासाठी महिला व पुरुषांच्या रांगाही लागल्या. 'गणगण गणात बोते'ने अन् टाळ-मृदंगाच्या गजराने दिग्रस येथील वातावरण चांगलेच दुमदुमून गेले. पालखी आल्यानंतर रिंगणाचा सोहळा असतो. हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ आवर्जून दिग्रस या ठिकाणी धाव घेतात. हा सोहळा म्हणजे एक आनंदाचाच क्षण असतो. त्यामुळे हा महत्वाचा क्षण कोणी गमावत नाही. रात्रभर याठिकाणी टाळ-मृदुंगाचा गजर सुरूच राहतो. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. मात्र पोलिसांच्या नाकावर टिचून यावर्षी चोरट्यांनी दिंडीत हात साफ केला. या ठिकाणी पालखी येण्याच्या दिवशी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तरुणांनी सहभागी होत रक्तदान केले.