हिंगोली - हेमंत पाटील खासदार झाल्याने आणि नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यामुळे ओंढा नागनाथ येथील युवकाने शुक्रवारी मोफत दाढी कटिंग करून आगळा वेगळा उपक्रम राबवला. महेश खुळखुळे, असे उपक्रम राबवणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याच्या उपक्रमाची केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातच चर्चा होत आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हिंगोली जिल्हा ओळखला जातो. मात्र, मागील लोकसभा निवडणुकीत हा शिवसेनेचा किल्ला काँग्रेसने हस्तगत केला. येथे काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव निवडून आले. मात्र, त्यांच्यावर पक्षाने गुजरात प्रभारीची जबाबदारी दिल्यामुळे त्यांना मतदारसंघाकडे लक्ष देता आले नाही. त्यामुळे यावेळी सुभाष वानखेडे यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली. मात्र, पाटील यांनी त्यांचा पराभव केला. पाटील विजयी झाल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या महेश याने मोफत दाढी कटिंग करून त्याचा विजय साजरा केला.
साधारणतः दिवसभरात ८० ते ९० दाढी कटिंग केल्याची माहिती महेशने दिली. वास्तविक पाहता महेश नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतो. मात्र, दाढी कटिंग मोफतचा उपक्रम जिल्ह्यासह सर्वत्र चर्चेचा ठरत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढल्याने मानवा सह पशु-प्राण्यांना देखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्राण्यांच्या भटकंतीत वाढ झाल्याने महेश हा टँकरचे पाणी विकत घेऊन वनविभागाने केलेल्या पाणवठ्यात टाकण्याचा प्रयत्न करतो. त्याने चिमण्यांना पाणी पिण्यासाठी मिळावे यासाठी ३०० प्लास्टिकच्या वाट्या वन आणि शहर परिसरात लटकविल्या आहेत. नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्याने महेश हा सर्वांच्याच चर्चेचा विषय झाला आहे.