हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे एक रोही आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास अचानक गावात शिरला. दरम्यान, कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला, यामध्ये रोही गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांनी त्या रोह्याला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, जखमी झालेल्या रोहिने अखेर प्राण सोडले.
रामेश्वर तांडा येथे आज पहाटे एक रोही गावात शिरला. दरम्यान गावातील मोकाट कुत्र्यांनी रोह्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेला रोही मिळेल त्या रस्त्याने पळत सुटला. मात्र, कुत्र्यांनी पाठलाग करत त्याच्यावर हल्ला चढवला. या धावपळीत रोह्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या. सदर बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी त्याची सुटका केली. मात्र, कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे रोही अतिशय घाबरून गेला होता, त्याला गंभीर जखमही झाली होती. ग्रामस्थांनी कुत्र्यांपासून बचावाकरता या रोह्याला बांधून ठेवले.
हेही वाचा - हिंगोलीत 'ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह'चा 14 जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान काहींनी वनविभागाला माहिती दिली. मात्र, बराच वेळ होऊनही वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे रोह्याचा मृत्यू झाला. माहिती देऊनही वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - गुलाबाचे फूल अन् एक ग्लास दूध देऊन हिंगोलीत केले वाहनचालकांचे स्वागत; अपघातमुक्तीचा संदेश