हिंगोली- मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरीच्या घटना थंडावल्या होत्या. परंतु आज चोरट्यांनी थेट राज्य राखीव दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या घरावरच दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. शहरातील सुराणा नगर भागात एसआरपीएफचे जवान आर व्ही त्रिमुखे यांच्या घरावर आज पहाटेच्या सुमारास हा धाडसी दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी आजूबाजुच्या घरांच्या कड्या लावून त्रिमुखेंच्या कुटुंबीयांच्या गळ्यावर तलवारी ठेवत मुद्देमाल लुटून नेला.
आर.व्ही. त्रिमुखे अस या जवानांच नाव असून, ते हिंगोली येथील राज्य राखीव दलात कार्यरत आहे. ते सुराणा नगर भागात वास्तव्यास असून, तेथे आई वडील भाऊ , पत्नी असे आपल्या परिवारासह राहतात. तर जवान त्रिमुखे हे काही दिवसापासून बाहेर गावी कर्तव्यावर आहेत. दरम्यान, आज पहाटे अडीच ते तीन च्या सुमारास दहा ते बारा दरोडेखोर आले अन् त्यांनी जवानांच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी परिसरातील नागरिकांच्या घराचे बाहेरून कडी कोंडे लावून घेतले. त्यानंतर जवानांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून घराचा दरवाजा तोडला व आता प्रवेश केला, तर दरवाजा तोडण्याच्या आवाजाने कुटुंबातील व्यक्ती जाग्या झाल्या. मात्र दरोडेखोरांनी आत प्रवेश करताच सर्वांच्याच गळ्यावर तलवारी लावल्या होत्या.
आवाज कराल तर कापून टाकण्याची दिली धमकी-
यावेळी दरोडेखोरांनी त्रिमुखे यांच्या आई-वडिलांसह पत्नीच्या गळ्यावर तलवारी ठेवल्या. तसेच त्यांच्या भावाचे हात बांधून आवाज केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे सर्व त्रिमुखे कुटुंब चांगलेच हादरून गेले. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम अन अंगावरील दागिन्यांसह सर्वांचे मोबाईल देखील घेऊन दरोडेखोर पसार झाले.
आरडा ओरडा केल्याने शेजाऱ्यांनी घेतली धाव -
भेदरलेल्या कुटुंबाने आरडा ओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्रिमुखे कुटुंबाकडे धाव घेऊन धीर देण्याचा प्रयत्न केला. डोळ्यासमोर घडलेला प्रकार सांगितल्यानंतर अंगावर शहारे उभे राहत होते. नंतर सदरील घटनेची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
श्वान पथकाला केले पाचारण -
घटनास्थळी पाहणी केली असता, तेथे दरोडेखोरांच्या चप्पला व रुमाल आढळून आला. तसेच ठसे तज्ञाला देखील पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळापासून काही अंतरावर श्वानाने मार्ग काढला. मात्र पुढे श्वान घुटमळले. त्यामुळे जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिले आहेत.
घटनेने कुटुंब गेले हादरून -
सदरील घटनेने कुटुंब हे पूर्णपणे हादरून गेले असून, डोळ्या देखत घरातील मुद्देमाल लांबवण्यात आला आहे. तर गळ्याला तलवारी लावल्याने, सर्वांच्याच अंगाचे पाणी पाणी झाले होते. चोरट्यांचा तोंडाला बांधून असल्याने, चोरटे ओळखू आले नाही मात्र त्यांच्या अंगात जीन्स पॅन्ट व टी शर्ट असल्याने, चोरटे हे वीस ते पंचवीस वर्षातील असल्याचा अंदाज कुटुंबांनी लावला आहे.