हिंगोली - संपूर्ण जगभरात कोरोनाच्या संकटाचा युद्ध पातळीवर सामना केला जातो. त्यातच दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातही हळू हळू कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ती 289 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात पर जिल्ह्यातून अपडाऊन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे. मात्र, राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिनधात्मक कायदा 1897 हा 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये पर जिल्ह्यातून येणार्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. हिंगोली शहरातील सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात आपण करत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सील करून कार्यालयातील कार्यरत असलेल्या 12 कर्मचाऱ्यांना शासकीय क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर पूर्णपणे निर्बंध घातले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असल्याचा अपराध केला असे मानून, संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 रोग प्रतिबंधक कायदा 897 महाराष्ट्र कोव्हिड-19 उपाय योजना नियम 2020 अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे कळवले आहे. त्यानुसार जिल्ह्यात पर जिल्ह्यातून ये जा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या विदारक परिस्थितीतही बरेच कर्मचारी हे पर जिल्ह्यातून ये-जा करत असल्याने, हिंगोली जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यात भितीचे वातावरण आहे.