हिंगोली - औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या 6 रेशन दुकानदारांना रिपब्लिकन सेनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. गोदामपाल कदम यांना निलंबित करून लिपिक सुरवसे यांची बदली करण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना देण्यात आले. याप्रकरणाची त्वरित दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेने दिला आहे.
जिल्ह्यातील पुरवठा विभागाचा गलथान कारभार वाढल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. तांदुळ आणि गव्हाचे कट्टेच्या कट्टे पळवण्यापाठोपाठ आता कट्ट्यातून 5 ते 10 किलो रेशनचा माल काढून घेतला जात आहे. याविरोधात काही रेशन दुकानदारांनी औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयासमोर तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. इतर तालुक्यातीलही काही रेशन दुकानदार उपोषणाच्या तयारीत आहेत.
गजानन लोंढे, गजानन कुटे, मिलिंद मुळे, राहुल राऊत, दुधाजी ठोंबरे, गजानन सातपुते या रेशन दुकानदारांनी पुरवठा विभाग व गोदामपाल यांच्या विरोधात एल्गार पुकारत आमरण उपोषण सुरु केले आहे. शासकीय गोदामामधून धान्य कट्टे वजन करून मिळावेत, कट्ट्यांमधून 5 ते 6 किलो धान्य कमी दिले जाते, यामुळे गोदामपालाची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. गोदामपालांनी अपमानास्पद वागणूक देऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. शून्य टक्के व्यवहार असताना नियतन दिले गेले या प्रकाराची चौकशी करण्यात यावी. यापूर्वी दिलेली निवेदने आणि अर्ज निकाली काढण्यात यावे, या मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी उपोषणाला सोमवारी सुरुवात केली आहे.
विविध मागण्यासाठी वारंवार निवेदने देऊन, पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने हे पाऊल उचलल्याचे दुकानदारांनी सांगितले. औंढा नागनाथ तालुक्यानंतर इतर तालुक्यातील रेशन दुकानदारांनी गोदामपाला विरोधात दंड थोपटले आहेत. यामुळे रेशन धान्याचा काळाबाजार समोर येण्याची शक्यता आहे.