हिंगोली - सेनगाव तहसील कार्यालयाच्या गोदामातून निघालेले स्वस्त धान्याचे २०८ कट्टे थेट वाशिमच्या काळ्याबाजारात आढळून आले. त्यामुळे अजुनही जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या चौकशीतुन उघड झालेला आहे.
दुसरा ट्रक बोलावला -
गेल्या अनेक दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात रेशनचा काळा बाजार सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडुन कारवाईचा धडाका सुरू असला तरी ही रेशनचा काळा बाजार करणाऱ्यांवर काहीही परिणाम होत नाही आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक काळा बाजार हा सेनगाव तालुक्यात होत आहे. १८ जूनला सेनगाव येथील तहसील कार्यालयाच्या गोदामातून बटवाडी येथे रेशन घेऊन जाण्यासाठी १२७ कट्टे गहू, तर ८१ कट्टे तांदूळ, असे एकूण २०८ कट्टे ट्रकमध्ये टाकण्यात आले होते. यानंतर हा रेशन घेऊन जाणारा ट्रक रवाना झाला. मात्र, तो ट्रक बटवाडी मार्गे न जाता तो थेट गेला वाशिममार्गे गेला. यानंतर वाशिम जिल्ह्यातील कोकलगाव ते विरेंगाव रस्त्यावर थांबवून तेथे दुसरा ट्रक बोलावून त्यात हा रेशनचा माल टाकण्यात आला आणि तो ट्रक वाशिममार्गे पाठवून दिला.
हेही वाचा - हिवरेबाजारचा आणखी एक 'आदर्श' निर्णय.. कोरोनाने सर्व शाळा बंद असताना गावात वाजली शाळेची घंटा
रिकामा ट्रक गावी परतल्याने फुटले बिंग -
सेनगाव तालुक्यातील बटवाडी येथे रात्रीच्या सुमारास रिकामा ट्रक परत आल्याची माहिती मिळताच, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख हे पांडुरंग झाडे, भागवत झाडे यांच्यासह बटवाडी येथे पोहोचले. त्यांनी ट्रकचालकांची चौकशी केली. तर चौकशीमध्ये ट्रक चालकाने सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे रेशनचा माला हा विक्री केल्याचे बिंग फुटले. संपूर्ण प्रकरणाची माहिती सेनगाव तहसीलदार यांना देण्यात आली. रिकामा ट्रक हा गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
बारकाईने केली जातेय चौकशी -
या प्रकरणात रेशन दुकानदार व ट्रक चालकांची अति बारकाईने चोकशी सुरू आहे. नेमका किती क्विंटल माल नेण्यात आला? तसेच कुठे नेण्यात येत होता? गव्हाचे आणि तांदळाचे किती कट्टे होते? याबाबत सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार जीवन कांबळे यांनी दिली.