हिंगोली - जिल्ह्यात मागील १० ते १५ दिवसापासून पाऊस नसल्याने खरीप पिके कोमेजून जात आहेत. काही काही भागात तर जमिनीला भेगाही पडल्या आहेत. या भेगा पाहून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शेतकरी पाऊस पडावा म्हणून नाना प्रकारचे प्रयोग करीत आहेत. तर काही शेतकरी डोक्यावर किंवा टँकरचा आधार घेत पिके जगवण्यासाठी धडपड करत असल्याचे भयंकर चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. दरम्यान, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज कुठे सेनगाव परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावर्षी आतापर्यंतचा सर्वात जोरदार पाऊस झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील ३ ते ४ वर्षापासून अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. मृग नक्षत्र पूर्णतः कोरडेठाक गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. कसाबसा जिल्ह्यात पाऊस झाला त्यावरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी आटोपली. मात्र, आजघडीला १० ते १२ दिवस उलटले तरीदेखील पावसाने हजेरी लावली नसल्याने खरिपाचे पीक पूर्णतः सुकून जात आहे. काही भागात तर पावसाअभावी जमिनीला भेगादेखील पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढतच चालली.
ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता आहे, असे शेतकरी स्प्रिंकलद्वारे खरीप पिकांना पाणी देऊन जगविण्यासाठी धडपड करत आहेत. तर बरेच शेतकरी कपाशी किंवा झेंडूची रोपटे टँकरच्या पाण्यावर वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आज सेनगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. एवढेच नव्हे तर आतापर्यंतचा हा पहिलाच सर्वात मोठा पाऊस या सेनगाव परिसरात झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. या भागात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, ते शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत बसले होते. मात्र, आज निसर्गाने या भागातील संकटच टाळल्यागत झाले आहे.
इतर तालुक्याच्या तुलनेत सेनगाव तालुक्यात दरवर्षीच सर्वाधिक कमी पाऊस पडतो. त्यामुळे या भागातील शेतकऱ्याने जोरदार पावसाची अपेक्षाच सोडून दिली होती. मात्र, आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. उशिरा का होईना आज पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना खरोखरच जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी समाधानी झाले आहेत.