हिंगोली- यंदाच्या वर्षी पावसाळा वेळेत सुरू झाला. मात्र सुरुवातीच्या काळात काही ठिकाणी नुकसानीचा ठरलेल्या पावसाने नंतर मात्र दडी मारली होती. यामुळे अतिवृष्टीतुन वाचलेल्या पिकांना पाण्याची नितांत गरज भासू लागली होती. त्यातच आज पहाटेपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असलेला शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले असले तरी मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे याचा फटका खरिपाच्या पिकांना बसत होता, माळरानाची तर पिके दुपारच्या वेळी पूर्णपणे सुकून जात होती. मात्र आज(सोमवारी) पहाटे पासून झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हा पाऊस आता रब्बी पिकासाठी देखील उपयोगी ठरणारा पाऊस आहे.
खरिपातील नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक फायदेशीर ठरते. आज सकाळी सुरू झालेला पाऊस या पिकांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. या पावसामुळे सोयाबीनच्या उताऱ्यामध्ये बऱ्यापैकी वाढ होण्यास मदत होणार आहे. सध्या सोयाबीनला फुले लागत आहेत, तर मुगाला देखील शेंगा लागत आहेत, आता या पावसामुळे उताऱ्यात वाढ होणार असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे.