हिंगोली - हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे आज हिंगोली जिल्ह्यातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दिसून आले.
विजांच्या कडकडाटासह पाऊस
संपूर्ण महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने लावला होता, त्या अनुषंगाने आज दुपारनंतर हिंगोली जिल्ह्यातील वातावरणामध्ये बदल जाणवायला सुरुवात झाली सकाळपासूनच तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने, दुपारच्या वेळी उकाडा जाणवत होता. सायंकाळच्या वेळी अचानक वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला. अन् दुपारी तीनच्या सुमारास अचानकपणे जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातून शहरी ठिकाणी आलेल्या ग्रामस्थांची एकच धांदल उडाली.
बँकेत शेतकऱ्यांची गर्दी
सध्या विविध योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले आहेत ते काढण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतरही बँकेमध्ये शेतकरी गर्दी करीत आहेत. अशातच आज आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. तर मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बँकच्या पाठीमागे असलेल्या हॉलमध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था केल्याचे दिसून आले.
खते, बी-बियाणे भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ
सध्या शेतकरी हे शेतीचे साहित्य खरेदी करण्यासाठीदेखील हिंगोली या ठिकाणी दाखल झाले आहेत. मात्र पावसामुळे त्यादेखील शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. पेरणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी पेरणी योग्य साहित्य, खते, बी-बियाणे भरून घेत आहेत.