हिंगोली- तेलंगणा राज्यात पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आजही महिला अजिबात सुरक्षित नसल्याचा अनुभव येतो आहे. त्यामुळे आम्ही हिंगोलीकर या ग्रुपने हिंगोलीत मूकमोर्चा काढत प्रियांकाला श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाला निवेदन दिले.
पशुवैद्यकीय डॉक्टरवर झालेल्या या अन्यायाने पुन्हा निर्भया याच घटनेची आठवण झाली आहे. वारंवार महिलांवर होत असलेले अत्याचार खरोखर ही शरमेची बाब असल्याचे मत 'आम्ही हिंगोलीकर' या ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. तरूणी कामावरून परत येत असताना अचानक बेपत्ता झाली होती. तिची स्कुटी पंक्चर झाली होती. ही बाब तिने आपल्या बहिणीला सांगितली होती. त्यामुळे बहीण भावनाने तिला टोलनाक्यावर थांबण्यास सांगितले होते. मात्र, तिथे एकटे थांबणे बरोबर नसल्याचे ती सांगत होती. दरम्यान, रस्त्यावर उभ्या असलेल्या या तरूणीला एका अज्ञाताने थांबवून सर्व दुकान बंद असल्याचे सांगत एक मुलगा येईल आणि पंक्चर काढून देईल असे सांगितले. मात्र, ती मंडळी तरूणीला संशयास्पद वाटली होती. ही बाब देखील आपल्या बहिणीला तिने सांगितली होती. रात्री पावणे दहा वाजता चक्क तिचा फोनच स्विच ऑफ झाला. त्यामुळे नातेवाईकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन ही बाब सांगितली. दुसऱ्या दिवशी चक्क पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या या तरूणीचा मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे देखील स्पष्ट झाले. ह्रदय पिळवटून टाकणारी ही घटना घडल्याने नातेवाईक व संपूर्ण महिलावर्ग भयभीत झाला आहे.
वारंवार घडणाऱ्या विकृत घटना कधी बंद होतील, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तिच्यावर हल्ला करणाऱ्या त्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. याच मागणीसाठी हा मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. गांधी चौक येथून हा मूकमोर्चा मुख्य मार्गाने काढण्यात आला होता.