हिंगोली - लॉकडाऊननंतर गावोगावी गुटखामाफिया सक्रिय झाले आहेत. असाच एक गुटखामाफिया औंढा पोलीस ठाणे हद्दीत गुटख्याची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांच्या पथकाने छापा मारला. या छाप्यात 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईने गुटखामाफियांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात 20 ऑगस्टपासून लॉकडाऊन शिथिल झाले आहे. त्यामुळे जेथे या चार महिन्याची उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत, काहीजण दिवस-रात्र कामावर राबत आहेत. तर दुसरीकडे मात्र गुटखा माफिया हे गुटख्याची ने-आण करण्यासाठी चांगलेच सक्रिय झाले आहेत.
औंढा नागनाथ पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या गोळेगाव शिवारातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंदणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांनी गोळेगाव परिसरात छापा टाकला. यावेळी सुभाष व्यंकट येळणेच्या शेतात असलेल्या घरात पाहणी केली असता, तेथे गुटखा आढळून आला.
पोलीस पथकाने पोते घेऊन जाणाऱ्या दुचाकीची तपासणी केली. गोणीमध्ये गुटखा आढळून आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घरची तपासणी केली असता, तेथे गुटख्याच्या आठ गोण्या आढळून आल्या. असा एकूण 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.