हिंगोली- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. तरीही विना कारण फिरणाऱ्यांना याचे अजिबात गंभीर्य नाही. पान-तंबाखू खाऊन रस्त्याने चालता चालता पिचकाऱ्या मारणारे तर असंख्य. मात्र, आज सार्वजनिक ठिकाणी थुंकणे एका दुचाकी चालकास चांगलेच भोवले आहे. वाहतुक शाखेच्या पोलिसांनी त्याला थुंकलेली जागा हाताने पुसायला लावून त्याच्याकडून एक हजार रुपये दंड वसूल केला आहे. या अजब कारवाईने पिचकारी मारणाऱ्यांचे मात्र आता धाबे दणाणले आहेत. बाहेर न पडण्याचे अनेकदा प्रशासनाने आवाहन करूनही काही परिणाम होत नसल्याने, वाहतूक शाखेने आता कारवाईचा नवीन फंडा आजमाविन्यास सुरुवात केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील मोठी दक्षता पाळली जात आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. एवढेच नव्हे तर एक दोन नव्हे तर तीन तीन वेळेस शहरातील सर्वच रस्ते सॅनिटाईज केले आहेत. दिवस रात्र पोलीस प्रशासन रात्रंदिवस रस्त्यावर तैनात आहेत. कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असली तरीही त्याचे अजिबात कुणाला गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. लोक जिथे मोकळी जागा दिसेल तिथे थुंकायला लागले आहेत. हीच वाईट सवय आज एकाला चांगलीच भोवली आहे. हिंगोली शहरातील बँक ऑफ इंडिया समोर एक जण सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचे वाहतूक शाखा कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच, त्याला सह पोलीस निरीक्षक ओंमकांत चिंचोळकर यांनी थुंकलेली जागा हाताने साफ करायला लावली.
कारवाई एवढ्यावर न थांबता त्याच्याडून एक हजार रुपयांचा दंड ही वसूल करण्यात आला. या कारवाईने रस्त्यावर पाहणारे चांगलेच हादरून गेले तर तो व्यक्ती पिचावून गेला. कुठे ही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याची आता काही खैर नाही. गुन्हा करेल त्याच्याकडून ती जागा स्वच्छ करत, दंड ही वसूल केला जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे सह पोलिस निरीक्षक ओंमकांत चिंचोळकर यांनी सांगितले.