हिंगोली - वसमत येथे एका व्हीआयपी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत 30 जणांना ताब्यात घेतले असून 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात अजूनही चोरी छुपे जुगार अड्डे चालवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विश्वास ही बसणार नाही, अशा व्हीआयपी जागेत हा जुगार चालवला जात होता.
हेही वाचा -
साखरा बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत 22 मोबाईल, 6 मोटार सायकल आणि 1 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 30 जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या जुगार अड्ड्याकडे मात्र शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे साफ दुर्लक्ष होते. अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत कळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर आणि घेवारे यांच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकत ही कारवाई केली.
हेही वाचा -
नगरपालिकेने बंद पाडला बाटली बंद पाणी उद्योग; लाखो रुपयांचे प्लास्टिक जप्त
या कारवाईमुळे वसमत शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका उच्चभ्रू वसाहतीत हा जुगार चालवला जायचा. त्यामुळे यावर कोणाही संशय व्यक्त करत नव्हते. मात्र, मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात या जुगार अड्ड्याचे बिंग फुटले. रात्र-रात्र हा जुगार चालायचा. स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याची कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.