हिंगोली - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासोबत दहशतवाद विरोधी पथकाने मारलेल्या छाप्यात तीन जिवंत काडतुसे आणि एक पिस्तुल सापडली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. यातील एक पिस्तुल झाडावर लपवून ठेवण्यात आली होती. याठिकाणी पहाटे पाच वाजता छापा मारण्यात आला.
धनसिंग उर्फ भाऊ शेषराव राठोड (वय -23 ), नवनाथ शेषराव राठोड (वय - 21) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींनी हत्या करण्याच्या अनुषंगाने हा शस्त्रसाठा लपवून ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोनी पंडित कच्छवे, पोलीस उप निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी पथकासह बोडखा येथे शुक्रवारी पहाटे पाच वाजता छापा टाकला. यावेळी झडती घेताना एका पोत्यात 50 हजार रुपये किंमतीची एक पिस्तुल सापडली. त्यात दहा हजार रुपये किंमतीची तीन जिवंत काडतुसे देखील होती.
सोबतच एक चाकू आणि विशेष म्हणजे जुनी 5 हजार रुपयांची भरमार रायफल आढळून आली आहे. एका छोट्या पिशवीत छ्रररे आढळून आले आहेत. दोन्ही भावांविरोधात ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासगर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपअधीक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, सुभाष आढाव, पोउपनी बाबासाहेब खार्डे, शंकर जाधव, विलास सोनवणे, रुपेश धाबे, महेश बांडे, शेख शफी, आकाश टापरे आदींनी छापा मारून शस्त्रसाठा जप्त केला.
मोठे रॅकेट असण्याची शक्यता
पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी दोघे भावंडं असून त्यांचे संबंध मोठ्या टोळीशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अद्याप अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी सविस्तर माहिती दिली.