हिंगोली - सध्याचे युग मोबाईल युग असून मोबाईलने तरुणांना वेड लावले आहे. नवनवीन फीचर्स, गेम असल्याने मोबाईल तरुणाईच्या गळ्यातील ताईतच बनले आहे. 'पब जी' गेमनेही तरुणाईला असेच वेड लावले आहे. हा खेळ ऑनलाईन असल्याने एकावेळी अनेक तरुण यामध्ये स्वतःचे देहभान विसरून त्यात मग्न होताना दिसून येत आहेत. तसेच १२वीच्या परीक्षाही आता संपत आल्याने 'पब जी' गेम खेळणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्याता आहे.
दिवसेंदिवस तरुणाईमध्ये मोबाईलची क्रेझ वाढत चालली आहे. सध्या ऑनलाईन सुरू असलेल्या 'पबजी'मुळे अनेक तरुणांना ही गेम खेळण्याचे वेड लागले आहे. जोरजोरात हसणे, जोक, कॉमेंट करणे, टींगल उडवणे हा अनुभव गेम खेळत-खेळत हे तरुण घेत आहेत. हा गेम स्पीकर ऑन करून खेळायचा असल्याने शहराच्या एकांतस्थळी तरुण सरार्स हा गेम खेळताना पाहायला मिळत आहेत.
मोबाईलवर तासनतास एक टक लावून गेम खेळणाऱ्या तरुणांमध्ये चिडचिडीचे प्रमाण वाढत असल्याचे पालक सांगत आहेत. एवढा राग अनावर होतो आहे, की सांगूच शकत नाही. समोरच्या व्यक्तीने जणू काय फारच मोठे नुकसान केले आहे. याला वेळीच आवर न घातल्यास यातून तरुणाईचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.