हिंगोली- सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजन हे कोरोना बाधित रुग्णासाठी नितांत गरजेचे आहे. मात्र वाढत्या करोनाबाधित रुग्ण संख्येच्या तुलनेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही विदारक परिस्थिती एकट्या हिंगोली जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांची आहे. सद्यस्थितीत हिंगोली जिल्ह्यात ३४० कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. जिल्ह्यात केवळ एकच दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. आज घडीला जिल्ह्यात १० हजार ६७८ कोरोनाबाधित आहेत. ९ हजार १७० रुग्ण हे बरे झाले असून सुटी देण्यात आली आहे. तर सध्याच्या घडीला १० हजार ३३९ कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोरोना वार्ड, कोवाड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. यातील ३४० कोरोनाबाधितांची प्रकृती खालावली असल्याने, त्यांना ऑक्सिजन दिला जातोय. मात्र रुग्णांच्या तुलनेत हा ऑक्सिजन केवळ गुरुवार पर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यातुन ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. तर ऑक्सिजन बॅकअप कमी झाल्याची माहिती उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकाना समजताच नातेवाईकांतून भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
जालना - अहमदनगर येथून ऑक्सिजन पुरवठा
हिंगोली जिल्ह्याला जालना आणि अहमदनगर येथून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. सध्याच्या स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर, वसमत येथील उपजिल्हा रुग्णालय आणि कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात ३४० रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. आरोग्य विभाग आणि प्रशासन या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तर येथील सोयी सुविधांवर विविध पक्षाचे कार्यकर्ते लक्ष देत आहेत. प्रशासन दक्ष असले तरी सध्या ऑक्सिजन कमी झाला आहे. वास्तविक पाहता कोविड वार्डला ऑक्सिजन कमी पडू नये म्हणुन हिंगोली येथे दोन, वसमत व कळमनुरी येथे एक ऑक्सिजन टॅंक(ड्यूरा सिलिंडर) उभारण्यात आले आहेत. त्यातूनच पुरवठा देखील केला जातोय, इतर कोविड रूग्णालयांपैकी हिंगोली येथे सर्वाधीक जास्त ३ केएल ऑक्सिजन नियमितपणे लागत आहे. तर येथे १३ केएल एवढी क्षमता असणारे सिलिंडर आहेत. तर कळमनुरी आणि हिंगोली, ओंढा येथील ऑक्सिजन पुरवठा दोन दिवस पुरेल एवढा आहे. मात्र वसमत येथील ऑक्सिजन टॅंक रिकामा झाल्याने त्या ठिकाणी चार ड्युरा सिलिंडरमधून ऑक्सिजन पुरवठा केला जातोय. एका ड्युरा सिलिंडरचे बॅकअप हे सात ते आठ तास चालते. असे असताना देखील ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत.
ड्यूरा सिलिंडरचे बॅकअप चालते सात ते आठ तास
कोविड केअर सेंटर तसेच कोरोना वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन हा फारच गरजेचा ठरत आहे अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील ऑक्सिजन केवळ गुरुवारपर्यंत पुरेल एवढाच असून ऑक्सिजन संपल्यानंतर ड्युरा सिलिंडरमधून बॅकअप घेण्यात येणार आहे.
रुग्ण - नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी
सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे. कोरोनाची साखळी थांबविण्यासाठी प्रशासन परिश्रम करीत आहे. अशा स्थितीमध्ये आज घडीला जिल्ह्यात ३४० कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. या रुग्णांना ऑक्सिजन पुरेल एवढा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी ऑक्सिजनसाठा संपण्याची भीती अजिबात मनात धरू नये, अवघ्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जाईल त्यासाठी प्रशासन मोठ्या कसोशीने काम करत असून एकाही रुग्णाला ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. ज्या ठिकाणावरून आपल्या जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा केला जातोय तेथूनच आपल्याला ऑक्सिजन वेळेत पोहोचणार आहे असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.