हिंगोली - पुणे जिल्ह्यातील नारायण गाव येथून आपल्या गावी परतलेल्या एका युवकाची तपासणी करून, त्याला होम क्वारंटाईन राहण्याचा डॉक्टराने सल्ला दिला. मात्र, मित्र आल्याची माहिती मिळताच दोघांनी त्याची भेट घेऊन, त्याला हात भट्टी पिण्यासाठी घेऊन गेले. परत येताना दुचाकीचा अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोली तालुक्यातील डिग्रस वाणी येथे ही घटना घडली.
प्रवीण सरकटे असे मृताचे नाव आहे तर नितेश आसोले आणि गजानन आसोले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. नितेश हा पुणे जिल्ह्यातील नारायण गाव येथे कामानिमित्त गेला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो गावात परत आला. तो गावात येताच पोलीस पाटील विकास खंदारे यांनी त्याची नोंद करून त्याला सर्वप्रथम तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्याने शासकीय रुग्णालयात तपासणी करून घेतली असता त्याला होम क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टराने दिला. त्यानुसार तो शेतात राहायला गेला होता.
त्याचे मित्र आणि तो हातभट्टी पिऊन परत येताना त्यांच्या दुचाकाला अपघात झाला. परिसरात पेट्रोलिंगकरून परत येणाऱ्या बासंबा पोलिसांनी जखमींना शासकीय रुग्णालयात हलवले आणि या घटनेची माहिती डिग्रस वाणी येथील मयताच्या नातेवाईकांना कळवली. पोलिसांनी पंचनामा करून, मृतदेह शेवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवला.