हिंगोली - कुटुंबाचा कणा असलेली महिला घरातील सर्व कामे करून दिवसभरही राब राब राबते. पुरुषांच्या खांद्याल खांदा लावून आपल्या मुलांसाठी झगडणारी 'ती' जिवावर बेतेल असेही कामे करत असते. जिल्ह्यातीस अशीच एक दामिणी आहे, जी विहीर खोदण्यासाठी स्वत: दगड फोडीचे काम करत आहे. एवढेच नाही तर क्रेनची स्टेअरिंगही ती चालवत आहे.
सागरबाई राठोड असे या दामिनीचे नाव. त्या मूळच्या औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथील रहिवासी आहेत. सागरबाई यांच्या घरची अतिशय हलाखीची परिस्थिती आहे. त्यामुळे राबलं तरच घरात चूल पेटते. सुरुवातीला दोघे पती पत्नी मिळेल ते काम करून संसाराचा गाडा हाकत होते. मात्र, पुढे घरामध्ये सदस्यांची संख्या वाढत गेली. पैसा कमी पडू लागला. नंतर लक्ष्मण नाईक तांडा येथील काही कुटुंबांनी 13 वर्षांपूर्वी एकत्र येत विहीर खोदण्याचे काम हाती घेतले. तेव्हापासून सागरबाई व त्यांच्या घरातील सर्वच मंडळी विहिरीचे खोद काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात.
विहिरीचे खोदकाम करणे म्हणजे फार जिकिरीचे काम असते. याठिकाणी थोडे जरी दुर्लक्ष झाले तर प्राणाला मुकावे लागते. अशाच परिस्थितीत सागरबाई यांनी विहिरीचे खोदकाम सुरू केले. हे काम करीत असताना खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. त्या काळची आठवण आली तर आजही अंगावर शहारे उभे राहतात. मात्र, आता कठीण काम करण्याची सवयच झाल्याचे सागरबाई सांगतात. आज पुरूषाच्या बरोबरीने विहिरीचे कोणतेही काम सांगा, अगदी सहज करू शकते असही त्या म्हणतात. नेहमीप्रमाणे काम करीत असताना, एक वेळ पाय घसरला होता तेव्हापासून पायात वेदना होतात. त्यामुळे विहिरीत उतरून काम करणे टाळते. काम करताना मात्र खाणारी तोंड जास्त अन कमावणारे हात केवळ दोनच असल्याने, उपाशी राहण्याची वेळ येईल, या भीतीपोटी आजही वेदना सहन करीत काम करत असल्याचे त्या म्हणाल्या.
विहिरीत उतरता येत नाही म्हणून, क्रेन चालवण्याची जबाबदारी घेतली आहे. ही जबाबदारी उत्तमरित्या पार देखील पाडते. आपापल्या परीने अनेक महिला आपल्या कामांमध्ये पारंगत असतात जसे की महिला या विमान रेल्वे यासह विविध जोखमीची कामे स्वीकारतात. त्याच पद्धतीने सागरबाईने देखील एक जोखमीची जबाबदारी स्वीकारली आहे.
हेही वाचा - महिला दिन विशेष : संसाराचा गाडा हाकण्यासाठी 'तिने' हातात घेतले रिक्षाचे 'स्टेअरिंग'