हिंगोली- वसमत येथील स्त्री रुग्णालयात बाळंतीण महिलेची हेळसांड झालेल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचा निष्काळजीपणा दिसून आला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना बाळंतीण महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच रुग्णालयाने महिलेला क्वारंटाईन होण्यासाठी रुग्णालयातून पाठवून दिले. समाजसेवकांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर परत त्या महिलेला रुग्णलायात आणले गेले आहे. या प्रकाराने शस्त्रक्रिया झालेल्या महिलेच्या नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
कोरोना काळात शस्त्रक्रिया झालेल्या महिलेची हेळसांड वसमत येथील स्त्री रुग्णालयात झाली. यामुळे पुन्हा एकदा येथील यंत्रणेचा बोजवारा उडला आहे. वसमत शहरातील एक गर्भवती महिला 22 जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाली. 23 जुलै रोजी महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 27 जुलैच्या दुपारी 1 वाजेपर्यंत महिला आणि बाळ रुग्णालयातच दाखल होते. दरम्यान महिलेचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे रुग्णलायात एकच खळबळ उडाली.
रुग्णालय प्रशासनाने महिलेला क्वारंटाईन होण्यासाठी एका खाजगी ऑटोने क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविले. महिला उपजिल्हा रुग्णालयातील क्वारंटाईन सेंटमध्ये पोहोचली. तीने सर्व प्रकार सांगितला. यावेळी तुमची शस्त्रक्रिया झालेली आहे तुम्ही येथे राहू शकत नाहीत असे सांगताच ती महिला परत रुग्णालयात परत आली.
महिलेमुळे रिक्षाचालकाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता होती. तरी रुग्णालयाने महिलेला रिक्षाने क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवले. त्यामुळे निष्काळजी रुग्णालयावर कडक कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्याकडे समाजसेवकांनी केली आहे.