हिंगोली - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. अद्यावत प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोन दिवसात केवळ 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. 3 ऑगस्ट रोजी 7 तर 4 ऑगस्ट रोजी 2 नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. रुग्णांचा आकडा कमी झाल्याने, हिंगोलीकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. दरम्यान, कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासन अहोरात्र अथक परिश्रम घेत आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 38 जणांना अलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे.
नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णामुळे हिंगोली जिह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 718 वर पोहोचला आहे. आत्तापर्यंत 539 रुग्ण बरे झाले असून, सध्या 171 रुग्णांवर विविध कोरोना वार्ड तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर 8 कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी असुंडा येथील 1, वसमत तालुक्यातील चिंचोली येथील 1 असे दोन रुग्णांचा समावेश आहे.
3 ऑगस्ट हिंगोली शहरातील गाडीपुरा भागात 1, विठ्ठल कॉलनी 1, नगर परिषद कॉलनी 1, पलटण 1, कासारवाडा 1, वसमत शहर रेल्वे स्टेशन रोड 1, तर वसमत तालुक्यातील चोंढी 1 असे 7 रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात पुन्हा 33 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुख्य म्हणजे, हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या 18 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्याना बायपँप मशीनवर ठेवले आहे.