हिंगोली - महाराष्ट्रासह इतर राज्यात भागवत धर्माचा प्रसार करणारे संत नामदेव महाराज, यांची पालखी जन्मभूमी हिंगोलीतून दरवर्षी मोठ्या उत्साहात पंढरपूर येथे रवाना होत असते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांच्या पादुका आणि पालखी नेमकी कशी पोहोचवायची? हा प्रश्न मंदीर विश्वस्तांसमोर निर्माण झाला आहे.
हेही वाचा... यंदाच्या पालखी सोहळ्याला तीन पर्याय; अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक
मंगळवारी नामदेव मंदीर जिर्णोद्धार समितीच्या विश्वास्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पालखी घेऊन जाण्यासाठी व्यवस्था करून देणे. यासह काही भक्तांना देखील पंढरपूरला जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
कोरोनाचा फटका प्रत्येक घटकाला बसलेला आहे. मोठमोठे उद्योजक आणि हातावर पोट असणाऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता धार्मिक स्थळांना देखील कोरोनाचा फटका बसला असून, सर्वांचे लक्ष पुढे येणाऱ्या आषाढी एकादशी आणि पायी दिंडी सोहळ्याच्या निर्णयाकडे लागले आहे. खरेतर या सोहळ्याची राज्यासह इतर भागातील वारकरी भाविक मोठ्या आतुरतेने प्रतिक्षा करत असतात. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच या सोहळ्यावर कोरोनाचे सावट पसरले आहे.
संत नामदेव महाराजांची जन्मभूमी असलेल्या नरसी (जि. हिंगोली) येथून नामदेव महाराजांच्या पादुका आणि पालखी मोठ्या आनंदात पंढरपुराकडे रवाणा होत असतात. मात्र, ही पालखी यावर्षी कशी जाणार ? हा प्रश्र सध्या मंदीर विश्वस्तांपुढे आहे. नामदेव महाराजांच्या पादुका पंढरपूर येथे पोहोचवण्यासाठी वाहनाची व्यवस्था प्रशासनाने करून द्यावी. त्यासोबत विश्वस्तांमधील 9 ते 10 भाविकांना जाण्याची परवानगी देण्यात यावी. अथवा हेलिकॉप्टरने पादुका घेऊन जाण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी श्री संत नामदेव मंदिर संस्थानने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.