हिंगोली : Digraswani massacre : डिग्रसवाणी हत्याकांडात नवनवे खुलासे समोर येत आहेत. या तिहेरी हत्याकांडानं संपूर्ण शहर हादरलं आहे. 11 जानेवारी 2024, शिवरा, दिग्रसवाणी येथे दुचाकी अपघातात आई वडील मुलाचा मृत्यू झाला होता. कुंडलिक जाधव, कलावती जाधव तसंच मुलगा आकाश जाधव अशी मृतांची नावे आहेत. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अहवालात मृतदेहांवर गंभीर जखमांच्या खुणा असल्याचं दिसून आलं आहे. आता हा अपघात नसून हत्येला अपघाताचं स्वरूप देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
क्राईम पेट्रोल पाहून खून : आई, वडील आणि भावाचा खून हा अपघाती वाटावा यासाठी आरोपीनं क्राईम पेट्रोल सारख्या मालिका पाहिल्या होत्या. तसंच त्यानं दृष्यम चित्रपटही अनेकवेळा पहिल्याचं तपासात समोर आलं आहे. अत्यंत शांत डोक्यानं हा खून केल्याचं तपासात उघड झालं असल्याची माहिती हिंगोली पोलिसांनी दिली. या प्रकरणी आरोपी महेंद्र जाधवला पोलिसांनी अटक केलीय.
घराच्या भिंतीवर रक्ताचे डाग : पोलिसांनी तपास सुरू केला असता, पहिला संशय पोलिसांना महेंद्र जाधववर आला कारण त्यांनंच नातेवाईकांना फोन करून कुटुंबीय बेपत्ता असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी महेंद्र जाधव यांची चौकशी सुरू केली मात्र, कोणताही सुगावा लागत नव्हता. पोलिसांना महेंद्र जाधववर संशय होता, त्यामुळं पोलीस पथकानं महेंद्र जाधवच्या घराची झडती घेतली. तेव्हा पोलिसांना भिंतीवर रक्ताचे डाग दिसले. त्यामुळं पोलिसांच्या संशयाला पुष्टी मिळाली. तिहेरी हत्याकांडाचा थरार उघड झाला आहे.
अपघात झाल्याचा बनाव : महेंद्र जाधवनं पोलीस तपासात स्वत:च आई-वडील आणि भावाचा खून केल्याचं सांगितलं. महेंद्र जाधवनं घरगुती वादातून स्वतःच्या आई-वडिलांना, लहान भावाला झोपेच्या गोळ्या दिल्या. नंतर त्यांची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं. तीन खून केल्यानंतर महेंद्र जाधव यानं रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, त्या तिघांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकून दिले. कोणतीही शंका येऊ नये, म्हणून त्यानं मोटरसायकलचे हेडलाइटसह इतर काही भाग तोडले. पाहणाऱ्यांना हा अपघात वाटावा अशा पद्धतीनं त्यांना मोटरसायकलची अवस्था केली होती.
दृष्यम चित्रपट पाच वेळा पाहिला : खून करण्यापूर्वी महेंद्र जाधवनं दृश्यम चित्रपट पाच वेळा पाहिला होता. तसंच क्राईम पेट्रोल मालिकेचे एपिसोड अनेक वेळा पाहिले होते. महेंद्र जाधव हा गेल्या अनेक दिवसांपासून या खुनाच्या नियोजनात व्यस्त होता. 9 जानेवारीच्या रात्री त्यानं सर्वात आधी लहान भावाला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत त्याला विजेचा शॉक दिला. तसंच त्यानं त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपीनं डिग्रसवाणी ते सिरसम रोडवरील एका वळणावर रस्त्याकडेच्या खड्ड्यात नेऊन त्याचा मृतदेह टाकला. दुसर्या दिवशी दुपारी आईला आरोपीनं चहामध्ये झोपेच्या गोळ्या देत शेतात नेऊन आईचा देखील खून केला. त्या दिवशी त्यानं मृतदेह शेतातच ठेवला. रात्री तो मृतदेह परत खड्ड्यामध्ये मयत आकाशच्या मृतदेहाजवळ नेऊन टाकला. परत घरी येऊन रात्री उशिरा वडिलांचाही त्याच पद्धतीनं खून करून त्याच खड्ड्यामध्ये मृतदेह टाकला.
आई-वडील भावाची हत्या : आरोपी महेंद्रने पोलिसांना सांगितले की, त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पैसे दिले नाहीत. पैसे मागितल्यावर ते त्याला टोमणे मारायचे. नातेवाईकांसमोर अपमानित करण्याचा प्रयत्न केल्याने आई-वडील आणि लहान भाऊ आकाश यांच्यावर त्याचा राग होता. यातूनच त्याने तिघांच्या हत्येचा कट रचला. दृष्यम आणि क्राईम पेट्रोल पाहून या तिघांच्या हत्येची संपूर्ण योजना आपणच आखल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी महेंद्रला विचारले की तो एकट्यानेच त्या तिघांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला कसे नेले? महेंद्रने पोलिसांना त्याचे प्रात्यक्षिक दाखविले असता पोलिसही चक्रावून गेले.
हेही वाचा -