हिंगोली - लोकसभा दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आज अंतिम दिवस आहे. आज काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याच्या नियोजनासाठी महायुतीने सोमवारी वसमत येथे बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, मुंदडा समर्थकांनी यावेळी गोंधळ घातला. लोकसभेसाठी मुंदडा यांना तिकीट नाकारल्याच्या नाराजीतून कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
लोकसभेसाठी तिकीट देताना ज्याप्रमाणे जातीय समीकरणावरुन हेमंत पाटील यांची उमेदवारी निश्चित केली, त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुखही बदलावा, अशी मागणी यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्याकडे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आधी आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या नंतरच पुढचे बोला, असा पवित्रा घेल्याने संपर्क प्रमुखांसमोरही मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. त्यामुळे काही वेळातच ही बैठक गुंडाळण्यात आली. दरम्यान या तिढ्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कशा प्रकारे मार्ग काढतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंगोली लोकसभेसाठी अनेक पक्षांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, संभाव्य उमेदवारांना रिंगनाबाहेर काढल्याने त्यांच्यात नाराजीचा सुर कायम आहे. त्यामुळे नाराज झालेले उमेदवार बंडखोरी करतात की काय ? अशी परिस्थिती सध्या हिंगोलीत पाहायला मिळत आहे. याचे ताजे-तवाने उदाहरण म्हणजे सोमवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्या भाषणावेळी मुंदडा समर्थकांनी गोंधळ घातला. हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभेची उमेदवारी का दिली, असा सवाल या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. पाटील यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्तेच संतप्त झाल्याचे पहावयास मिळाले. मुंदडा सनर्थकांचा अंतर्गतवाद चव्हाट्यावर आलाय. हा गोंधळ उडाल्याने समोर पत्रकार आहेत. हा वाद आपण घरच्या घरी मिटवू, असे म्हणत बैठक गुंडाळण्यात आली. आता उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देशन भरण्यासाठी दाखविण्यात येणाऱ्या शक्ती प्रदर्शनामध्येही, हे नाराज कार्यकर्ते सहभागी होतील किंवा नाही याचीही चर्चा जोरात रंगत आहे.
या पद्धधिकाऱ्यांची राहणार उपस्थिती -
हिंगोली मतदारसंघातून अर्ज भरण्यासाठी आज सर्वच उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी शहरात आज महायुतीच्या उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री दिलीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर काँग्रेसकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह अनेक पदाधिकारी हिंगोलीत दाखल होणार आहेत.