हिंगोली - जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज हिंगोली जिल्ह्यात एकूण 56 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आठ रुग्ण हे अँटीजन तपासणीमधून उघड झाले आहेत. एकाच दिवसात एवढे मोठे रुग्ण पहिल्यांदा आढळलेले आहेत. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर कोरोनाचा कहर सुरू असल्याचे आजच्या आकडेवारी वरून पुढे आले आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी हिंगोली शहरातील देवगिरी भागात 1, तर जिल्हा परिषद कॉटर येथे तीन, तोफखाना 1, समंती कॉलनी 1, मंगळवारा 1, चोंढी स्टेशन 1, श्रीनगर 1, राज्य राखीव दल येथील 33 जण कोरोनाबाधित सापडले, तर वसमत येथील जवाहर कॉलनी येथे 4, बँक कॉलनी 4, मंगळवार पेठ 1, स्त्री रुग्णालाय 1, पंतगे कॉलेज समोर 1, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा 1, बुरसे गल्ली 1 असे 56 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात 654 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 435 रुग्ण हे बरे झाल्याने त्यांना प्रशासने सुट्टी दिली आहे. 211 कोरोनाबाधित रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटर व कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. तर आज पाच रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. कोरोना वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या 19 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर यातील दोघेजण अतिगंभीर असल्याने त्या दोघांना बायपँप मशीनवर ठेवण्यात आले आहे.
हिंगोलीतल्या आरोग्य विभागाचा ढिसाळपणा
सध्या कोरोनाची दहशत एवढी पसरली आहे की, कोरोना झालाय, अशी माहिती कळताच त्या कुटुंबाकडे वाईट नजरेने बघणार्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रशासन सदरील कोरोनाबाधित रुग्णांची नावे अजिबात उघड होऊ देत नाही. तर याची खबरदारी देखील तेवढीच घेतली जाते. मात्र, हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात रुग्णांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. चेहरे दिसल्यामुळे कोण-कोण कोरोनाबाधित आहे हे सर्वांना पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हे योग्य की अयोग्य अजूनही कळू शकलेले नाही. मात्र, या कृतीने सर्वच हैराण आहेत.