हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका महिन्यापासून शेतीमाल खरेदी बंद होती, आजपासून सुरुवात केल्याने मोंढा गजबजल्याचे दिसून आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शेतीमाल खरेदी करण्यासाठी सुरुवात केली. तर माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था केल्याची माहिती सभापती हरिश्चंद्र शिंदे, सचिव नारायण पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सर्वच व्यापार पेठ ठप्प होती. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर स्वयंचलित सॅनिटायझर बसविण्यात आलेले आहे. याठिकाणी शेतीमाल खरेदीसाठी घेऊन येणारा शेतकरी सर्वप्रथम तो सॅनिटायझ झाल्यावरच त्याला आत प्रवेश दिला जातोय. त्याचबरोबर मास्कची आणि सॅनिटायझरची देखील व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने केलेली आहे.
संकटाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेती मालाची लूट होणार नाही याची देखील काळजी घेण्याची सूचना कृषी उत्पन्न समिती चे सभापती शिंदे यांनी अडत व्यापार्याला दिल्या आहेत. आज तुरीची एक हजार क्विंटल तर सोयाबीनची 600 क्विंटल आवक झाल्याची माहिती सचिव पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर व्यापाऱ्याकडून तात्काळ पैसे टाकले जाणार आहेत. त्यामुळे निश्चितच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा व्यापाराच्या निर्णय ही लाख मोलाचा ठरणार आहे. तर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल खरेदीसाठी आलेल्या व्यापारी व त्यांना तसेच शेतकऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याच्या सूचना देण्यात येत होत्या.