हिंगोली - नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या मुलभूत गरजा आहेत. त्याबरोबर आता मोबाईलदेखील मुलभूत गरज बनली आहे. ही गरज पाहता मोबाईल कंपन्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा देत आकर्षित करत आहेत. त्यामुळे लोकही महागडे मोबाईल घेतात. मात्र, सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील मोबाईल धारकांना वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागतो आहे.
हातात मोबाईल आहे. मात्र, गावात नेटवर्क नसल्याने सर्वांची मोठी पंचायत झाली आहे. कोणाला संपर्क करायचा असेल तर सर्वप्रथम झाड शोधावे लागते. काहीवेळा संपर्क होतो. तर, काहीवेळा होत नाही. त्यामुळे त्रासलेल्या गावकऱ्यांनी झाडावर चढून आंदोलन केले.
हेही वाचा... 'बुलाती है मगर जाने का नही..' तृप्ती देसाई यांचं इंदोरीकर आणि समर्थकांना आव्हान
आजकाल प्रत्येक सुविधा ही मोबाईलवर घर बसल्या सहज उपलब्ध होत असते. अपघात झाला तर 108 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावता येते. अग्निशमन दल, पोलीस किंवा प्रसूतीसाठी रुग्णालयापर्यंत गरोदर मातांना नेण्यासाठी जननी शिशु योजनेअंतर्गत 102 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध होते. मात्र नेटवर्क नसेल तर संपर्क कसा करायचा ? हा प्रश्न असल्याने ताकतोडा येथील ग्रामस्थांनी झाडावर चढून विविध कंपन्यांचे लक्ष वेधण्यासाठी आगळंवेगळं आंदोलन केले.