हिंगोली : डॉ. प्रज्ञा सातव ह्या मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दिवसातून दोन ते तीन गावांना भेटी देत आहेत. गावातील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते तसेच एक महिला पोलीस कर्मचारी नियमित असते. मात्र अशाही परिस्थीतीत काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये आमदार सातव यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल केली आहे. स्वतः प्रज्ञा सातव यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचे फेसबुक व ट्विटरवर पोस्ट केली आहे.
नेमके काय घडले?: नेहमीप्रमाणे त्या भेटी देण्यासाठी गावेगावी जात असताना आमदार सातव कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा या गावांमध्ये बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास गेल्या होत्या. मात्र त्यांच्या कारजवळ एक अनोळखी व्यक्ती येऊन थांबल्यामुळे सातव आपल्या कारखाली उतरल्या नाही. काही वेळात त्यांच्या कार जवळ ग्रामस्थ येऊन थांबले. त्यामुळे त्या कारमधून खाली उतरून ग्रामस्थांसोबत संवाद साधत होत्या. त्यावेळी तोच एक व्यक्ती त्यांच्या पाठीमागून त्यांच्याजवळ आला. प्रज्ञा सातव यांना पाठीमागे ओढून त्याने सातव यांच्या गालावर जोरात चापट मारली.
कळमनुरी पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार : अचानक चापट मारण्याचे पाहून कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला तर तो चापट मारणारा कार्यकर्ता घटनास्थळावरून पळून गेला आमदार प्रज्ञा सातव्यांनी थेट कळमनुरी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली, रात्री उशिरा कळमनुरी पोलिसांठाण्याच्या पथकाने कसबे धावंडा येथे धाव घेऊन महेंद्र नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले, नेमका हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरुन केला याचा पोलीस तपास करीत आहेत.
किती ही हल्ले करा मी घाबरणार नाही : माझ्यावर अशाप्रकारे कितीही, हल्ले करा मी अजिबात घाबरणार नाही. एका महिला आमदारावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला केल्यासारखे आहे. परंतु अशा हल्ल्यांचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. माझ्या पाठीमागे दिवंगत खासदार राजू सातव यांचे आशीर्वाद आहेत. त्यांचे राहिलेले स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी अहोरात्र लोकांची कामे करणार आहे. त्यामुळे अशा हल्ल्याने माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच मी कुणाचे वाईट करत नाही. माझ्या जीविताला धोका असला तरीही मी जनतेची कामे करणार आहे, असे आमदार प्रज्ञा सातव यांनी सांगितले.
हेही वाचा : Shambhuraj Desai : सत्ता संघर्षाचा निकाल आमच्या बाजुने लागेल शंभूराज देसाई यांचे ठाण्यात वक्तव्य