हिंगोली - जिल्ह्यातील वसमत येथील विद्यानगर भागात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेने मात्र हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नारायण गोरे असे धक्कादायक कृत्य करणाऱ्या नराधम बापाचे नाव आहे. या बापाने ९ मे रोजी आपल्या पोटच्या नऊ वर्षाची मुलगी झोपेत असताना, तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर ही बाब कोणाला सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरून गेली. भीतीपोटी तिने आईजवळ काहीही सांगितले नाही.
मात्र, मुलीच्या वागणुकीत बदल पाहून आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता हा प्रकार उघडकीस आला. मुलीने आईला सगळा प्रकार सांगितल्याचे कळताच नराधम बाप पसार झाला. तेव्हा पीडित मुलीच्या आईने वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नराधम बापावर पोलिसांनी बाल लैगिंक अत्याचाराच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.