हिंगोली - गेल्या ३१ वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या कामगाराची १३ वर्षांपासून सेवापुस्तिकेत नोंद नाही. त्यामुळे त्या कामगाराला मानसिक धक्का बसलेला आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरीनाम सिंग मोहनसिंग पथरोड असे पीडित कर्मचाऱ्याचे नाव आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत चाललेला आहे. विशेष म्हणजे जे कर्मचारी या ठिकाणी रात्रदिवस राबत आहेत. त्यांच्यावरच मोठ्या प्रमाणात अन्याय करणे सुरू आहे. पथरोडे १९८९ पासून कार्यरत आहेत. दरवर्षी सेवापुस्तिकेत नोंद घेणे गरजेचे असते. मात्र, त्यांची २००७ पासून नोंदच घेतली नसल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे सेवा पुस्तिकेचे काही कागदही फाडल्याचे निदर्शनास आले आहे. हा विभाग एवढ्यावरच थांबला नसून सेवा पट पुस्तकातील महत्वाचे पान लिपकाने फाडून टाकल्याचा आरोपही केला जात आहे. कर्माचाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे पथरोड यांचे म्हणणे आहे.
लिपिकाच्या जाचास कंटाळून ९ एप्रिलला अनिल सुभाष भगत या कक्ष सेवकाने गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याविरोधात अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावरूनच जिल्हा सामान्य रुग्णालयात वरिष्ठांचे साफ दुर्लक्ष असल्याचे कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.
सेवापुस्तिकेत नोंद असल्याने मिळतात 'हे' लाभ
सेवा पुस्तिका हा कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा आरसा असतो. यामध्ये करण्यात आलेल्या नोंदीवर पेन्शन मंजूर होते. तसेच पगारवाढ आणि सुट्टीचाही लाभ मिळतो. एवढेच नव्हे तर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास सेवापुस्तिकेवरूनच लाभ दिला जातो.
आता हा सर्व प्रकार झाल्यानंतर आरोग्य प्रशासन यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कोणतीही कार्यवाही न केल्यास वर्ग ४ चे सर्वच कर्मचारी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.