हिंगोली - कोरोनाचा फटका हा प्रत्येक घटकाला बसला आहे. यामध्ये लहानसहान व्यवसायिकांसह बँड पथक मालकांचा देखील समावेश आहे. कोरोनामुळे एकही विवाह समारंभ पार पडला नसल्याने बँड मालकासह मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे आम्हालाही नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मानवहित लोकशाही पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे.
संपूर्ण आयुष्य कलेवर जगणाऱ्या समाजामध्ये मातंग समाज आहे. हा समाज बँड पथक, झाडू बनविणे त्यातून जी मजुरी मिळेल यावरच आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. मात्र कोरोना काळामध्ये ना कोणते विवाह समारंभ झाले, नाही कोणत्या बाजारपेठा सुरू होत्या. त्यामुळे या समाजावर एवढी वाईट वेळ येऊन ठेपलेली आहे की आज घरात एक वेळच्या जेवणाचीदेखील मोठी भ्रांत निर्माण झालेली आहे. यातील काही मजुरांनी व्यवसाय बदललाय मात्र त्यातूनही काही उपयोग होत नसल्याने विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनस्तरावरून बँड मालकांना दोन लाख तर मजुरांना 25 हजार रुपये मदत म्हणून देण्यात यावे, यासह विविध मागण्याचे निवेदन मानवहित लोकशाही पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना यांना देण्यात आले.
डॉ. माहुरकर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करा!
हिंगोली जिल्ह्यातील खासगी रुग्णलयाचा कारभार ढेपळला असून, चुकीच्या औषध उपचारामुळे माहूरकर रुग्णालयात गौरव अनिल खंदारे या बालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉ. माहुरकर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, अशी मागणी देखील मानवहित लोकशाही पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.