हिंगोली - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची महिना भरापासून तयारी सुरू होती. हिंगोलीतल्या विरेगाव येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपनीलवार यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीतील अवास्तव खर्चाला बगल देत एका गरीब व्यक्तीच्या मुलीचा विवाह सोहळ्याचे आयोजन करून समाजा समोर आदर्शच ठेवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची तयारी सर्वत्र जोरात सुरू होती. तशीच तयारी विरेंगाव येथे ही सुरू होती. मात्र, शिवजयंतीचे औचित्य साधून काही तरी सामाजिक उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा शिवजयंती बैठकीमध्ये काही सदस्यांनी व्यक्त केली. जयंतीच्या खर्चातून विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचे नियोजन केले. सर्वानुमते या जयंतीच्या पैशातून विवाह सोहळा करण्यालाच सहमती दिली. क्षणाचा ही विलंब न करता महोत्सव समितीने जाहीर आवाहनही केले.
हेही वाचा - महाशिवरात्रीला ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई
त्यानुसार गावातील बाळू पांचाळ यासह दोन कुटुंबांनी समितीच्या सदस्यांची भेट घेतली. त्यापैकी मारोतराव पांचाळ यांची परिस्थिती फार हलाखीची असल्याचे दिसून आले. समितीने जयंती महोत्सवासाठी लोकवर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली. जयंती महोत्सवात विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याने प्रत्येकाने स्वतःहून वर्गणी समितीकडे जमा केली. जयंतीच्या दिवशी अवास्तव खर्चाला पूर्णपणे बगल देऊन उत्कृष्ट पध्दतीने शिवजयंती महोत्सवात विवाह सोहळा पार पडला.
हेही वाचा - महाशिवरात्रीनिमीत्त औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
महोत्सवातील विवाह सोहळ्यात पंचक्रोशीतून शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खरोखर कोणत्याही कार्यक्रमात मंडळाच्यावतीने अवास्तव खर्चाला बगल देऊन असेच समाजपयोगी कार्यक्रम राबविले तर खरोखरच मुलींच्या लग्न खर्चाने हताश झालेल्या कुटुंबाला धीर मिळेल. शिवजयंती मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या उपक्रमाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.