हिंगोली- ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. हिंगोलीतल्या मालसेलू गावातील युवक अन ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. सरपंच, पोलीस पाटील अन प्रतिष्ठित व्यक्तींनी गावात युवकांचे स्थापन केलेले ग्रामसुरक्षा दल गावाचे रक्षण करत आहे. बाहेर गावातील व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्येने अर्धशतक पूर्ण केले आहे. यामध्ये सर्वाधिक राज्य राखीव दलातील जवानांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे अन कळमनुरी तालुक्यातील हिवरा बेल येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने, शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने संक्रमण करायला सुरुवात केलीय. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यक्ती आता जागे झाले आहेत.
मालसेलू ग्रामपंचायतीच्यावतीने गावात स्थापन केलेले ग्रामसुरक्षा दल गावातील विविध रस्त्यांवर सज्ज आहे. गावात बाहेरून प्रवेश करणाऱ्या व्यक्तीना तर बंदी घालण्यात आलीच आहे, मात्र गावातून देखील बाहेर जाणाऱ्यांची नोंद ठेवली जाणार आहे. या युवकांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. शिवाय या ग्रामसुरक्षा दलाचा एक ग्रुप बनविण्यात आला असून,त्यामध्ये एक मेकांना सूचना तसेच नियोजन केले जात आहे.
गावातील युवकांनी ग्रामसुरक्षा दलामध्ये स्वतःहून सहभाग नोंदविला आहे. त्याच बरोबर खबरदारीचा उपाय म्हणून, ग्रामपंचायतीच्या वतीने, प्रत्येक कुटुंबाला एका सॅनिटाइझरची बॉटल वाटप करण्यात आली आहे. कोरोना संदर्भात जनजागृती देखील केली जात आहे. यासाठी राजू पाटील, कैलास देशमुख, भानुदास वामन, गंगाराम भिसे, सरपंच धम्मदीपक खंदारे, पोलीस पाटील सिधोधन भिसे आदी परिश्रम घेत आहेत.