हिंगोली - विधानसभेसाठी काँग्रेसने ५६ उमेदवारांची यादी जाहीर केली असून हिंगोलीसाठी सलग तीन पंचवार्षिक आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजपकडून हिंगोली मतदार संघासाठी विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे हे निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, वंचितकडून अजून उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी लोकसभेत चांगली मते मिळाल्याने वंचित कुणाला तिकीट देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र बोलतोय... पाच वर्षांनंतरही गडचिरोलीतील बोदली गावातील समस्या कायम
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. विविध पक्षाचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. हिंगोली विधानसभा मतदार संघात काँग्रेसकडून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर तर भाजपकडून तान्हाजी मुटकुळे हे निवडणूक रिंगणात पुन्हां उमेदवार राहतील अशी दाट शक्यता आहे. अजून तरी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र मुटकुळे हे जोमाने कामाला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या दोन उमेदवारां व्यतिरिक्त हिंगोली विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून तगडा उमेदवार देण्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे वंचितचा उमेदवार कोण? कोणाच्या नावावर शिकामोर्तब होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - ओवैसी यांनी केली औरंगाबाद शहरातील तीन उमेदवारांची घोषणा
वास्तविक पाहता वंचितच्या वाटेवर अनेक दिग्गज असल्याच्या चर्चा ही राजकिय वर्तुळात जोरदार सुरू आहेत. मात्र वंचितचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर हिंगोली विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठी देत वंचितमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली असली तरी ही अजून कोणत्याही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केलेले नाही.
हेही वाचा - रविकांत तुपकरांचा रयत क्रांती सेनेत प्रवेश; सदाभाऊंनी केले स्वागत