हिंगोली- गणेशोत्सव काळात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगारावर करवाई करण्याचा धडाका लावला. दिवसागणिक कारवाई होत असली अन यामध्ये राजकीय तथा अनेक प्रतिष्ठित अडकलेले असताना देखील जुगारचे प्रमाण अजिबात कमी झालेले नाही. गुरुवारी ओंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ येथे माजी जि प सदस्यांच्या आखाडयावर मारलेल्या छाप्यात 7 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
आखाड्यावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. जगदीश भांडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुरजळ येथे आखाड्यावर छापा टाकून, नऊ जणांना ताब्यात घेत 7 लाख 76 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यात आखाडा मालक बालाजी गणपत क्षीरसागर, रुस्तुम दाजीबा कदम (धानोरा), शिक्षक गंगाधर मानवते (जवळा), गजानन नागरे (असोला), पं. स.सदस्य भगवान कदम(तपोवन), श्रीपाद जोशी(जवळा), तलाठी परमेश्वर गरुड (सावंगी), निवृत्ती कदम(तपोवन), गजानन ढोबळे (असोला), अशी आरोपीची नावे आहेत. आरोपीमध्ये प्रतिष्ठितांचा समावेश असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरुन जुगार साहित्य, रोख 52 हजार 250 रुपये, 59 हजार रुपये किंमतीचे 7 मोबाईल, 1 लाख 65 हजार रुपये किमतीच्या 4 दुचाकी, 5 लाख रुपये किंमतीची एक कार असा एकूण 7 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर जप्त केलेली कार ही एका मंडळ अधिकाऱ्याची असल्याची माहिती समोर येते आहे. एवढेच नव्हे तर हा जुगार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. चक्क माजी जि प सदस्य हा जुगारचा अड्डा चालवित असल्याने, प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. गणेशोत्सव काळात सर्रास पणे सुरू आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाया वरुन जिल्ह्यात जोरात जुगार सुरू असल्याचे समोर आले आहे. एखादा जि प सदस्याच्या अड्ड्यावर ही परिस्थिती असेल तर इतर ठिकाणी काय असेल ? मात्र, आजच्या कारवाई जुगार चालकांचे धाबे जरी दणाणले असले तरी जुगारवर मारलेल्या छाप्यातुन अवैध धंद्याचे बिंग फुटले आहे.