हिंगोली - उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घरात लावण्यात आलेल्या कुलरचा शॉक लागून एका ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. सत्यम बालाजी पवार (वय ९) असे मृत बालकाचे नाव आहे. बालाजी यांना हा एकुलता एक मुलगा होता.
राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. जून महिना सुरू झाला असला तरी उन्हाची तीव्रता काही कमी होताना दिसत नाही. या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घरोघरी फॅन, कुलर, एसीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. गेले दोन तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र, त्या पावसामुळे उकाड्यामध्ये आणखी वाढ होत आहे. त्यामुळे अजूनही कुलरची हवा घेतल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, काळजी घेणेही तेवढेच गरजेचे आहे. हिंगोली शहरातील महादेव वाडी परिसरातील एका कुटुंबाच्या घरात सुरू असलेल्या कुलर एका बालकाच्या जीवावर बेतले आहे. सत्यम आणि त्यांच्या बहिणी घरात खेळत होते, दरम्यान सत्यमचा अचानक कुलरला धक्का लागला अन सत्यम जोराने जमिनीवर कोसळला. घरात एकच आरडा-ओरडा सुरू झाली. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली. सत्येमला त्वरित रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सत्यमचा मृत्यूचा खुप मोठा धसका कुटुंबानी घेतला आहे. त्याच्या आईने त्याला आपल्या मांडीवर घेत त्याच्या डोक्यावर हात फिरवत होती. सत्यमचा मृत्यू झाल्याचे तिला सांगण्याचे कोणाचे धाडस होत नव्हते. ती सत्यमच्या डोळे उघडण्याची प्रतिक्षा करीत होती. सत्यम हा एकुलता एक मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सत्येमच्या वडिलांचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय असून, अतिशय हलाकिंच्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकत होते.