हिंगोली-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांचेच आर्थिक नियोजन कोलमडले आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना बसलाय. हाताला काम नसल्याच्या नैराशातून जिल्ह्यातील एका मजुराने गळफास लावून आत्महत्या केलीय. या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
साहेबराव मुंजाजी भोकरे(५०) रा. चोंढी बहिरोबा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भोकरे यांच्याकडे गुंठाभर ही शेती नसल्याने रोज मजुरीवरच त्यांच्या कुटुंबाचा गाडा अवलंबून आहे. भोकरेंना तीन मुले असून, दोन मुले हे पुणे अन अहमदनगर येथे कामानिमित्त गेलेले आहेत. गावात राहणारा एक मुलगा वेगळा राहत असल्याने भोकरे हे रोज मजुरी करून संसाराचा गाडा हाकत असत. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद असल्याने, हाताला काम नाही. त्यामुळे भोकरे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. अशा विदारक परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा याच विवंचनेत साहेबराव भोकरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार गजानन भोपे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी विजय साहेबराव भोकरे यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास जमादार भोपे हे करीत आहेत.
काम नसल्यामुळे मजुरांना दिवसेंदिवस विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गावात अन बाहेर गावावरून आलेल्या मजुरांना उपासमारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन गरजवंतांना मदत करणे नितांत गरजेचे आहे.