हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा बंद आहे. मात्र, अशा गंभीर परिस्थितीतही गुटखा ठराविक ठिकाणी पोहचवणाऱ्यांना कळमनुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. हे गुटखा माफिया भीतीपोटी वाहन सुसाट वेगाने पळवत होते. मात्र, पिपंळदरी येथे गाडीचा छोटासा अपघात झाला आणि हे सर्वजण पोलिसांच्या ताब्यात आले. खरंतर स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचा चोर म्हणून त्यांचा पाठलाग केला होता, मात्र तपासाअंती ते सर्वजण गुटखा माफिया निघाले.
हेही वाचा... #coronavirus लॉकडाऊनच्या काळात दारूचा काळाबाजार, अनेक वाईन शॉप, बारही फोडले
सद्दाम खा पठाण, शेख शहबुद्दीन शेख खाजा (रा. शिरडशहापूर) राम इंगळे (सिरसम), विठ्ठल गडदे, आनंद मामडे अशी आरोपींची नावे आहेत. सुनील रिठे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सुसाट वेगाने जीप घेऊन येत असल्याची माहिती पिपंळदरी येथील ग्रामस्थांना मिळताच त्यांनी जीप अडवण्यासाठी रस्त्यावर बाज ठेवली. मात्र, ती बाज मोडून जीप पुढे निघून गेली. ग्रामस्थांनीही देखील जीपचा पाठलाग केला. या घाईगडबडीत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् पथदिव्याला जोराची धडक दिली. ग्रामस्थ गाडीजवळ पोहोचले आणि गाडीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात धान्याची पोती आढळून आली. हे चोर असावेत, असा अंदाज लावत त्यांनी गुटखा माफियांना ताब्यात घेत चांगलाच चोप दिला. याच गडबडीमध्ये जीपमधील दोघेजण फरार झाले.
हेही वाचा... 'सपोर्ट नर्सेस अॅण्ड मिडवाइव्ज', डब्ल्यूएचओकडून यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम परिचारकांना समर्पित
या घटनेची माहिती कळंबोली पोलीस ठाण्यातील अधिकारी रंजित भोईटे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, जमादार शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संचारबंदीतही गुटखा नियोजित ठिकाणी पोहचवणाऱ्या या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.