हिंगोली- कोरोनाने संपूर्ण जग हादरून गेलेले आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहे. अशात हिंगोलीत मात्र हातभट्टीवाल्यांवर त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. यातच स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी कळमनुरी येथे पोल्ट्री फार्मजवळील हातभट्टीवर छापा टाकून सर्व साहित्य नष्ट केले आले. सोबतच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेख वाजीद शेख करीम, शेख अखिल शेख खालील आणि शेख जमीर शेख खालील अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी एका शेतात पोल्ट्री फार्मच्या बाजूला हातभट्टी लावल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यानंतर पथकाने कळमनुरीतील पोल्ट्री फार्म परिसरात धाव घेतली. याठिकाणी एकाच जागी पाच भट्ट्या अतिशय नियोजन पद्धतीने लावल्याचे दिसून आले. यावेळी 3 हजार रुपयांची 15 हजार लिटर गावठी दारू, तर 31 हजार रुपये किमतीचे 310 लिटर मोहफुल व गुळाचे सडके रसायन, असा एकूण 34 हजार रुपये किमतींचा साठा नष्ट केला गेला.
लॉकडाऊनदरम्यान मद्य विक्रीची दुकाने अनेक दिवस पूर्णतः बंद होती. त्यामुळे, अनेक मद्यप्रेमी या हातभट्टीवरच दिवस ढकलत होते. अशात सध्याच्या काळामध्ये हातभट्टीला चांगलीच मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर हातभट्टी विक्रेत्यांनी शक्कल लढवून पोल्ट्री फार्म असलेल्या ठिकाणी हातभट्टी सुरू केली. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा संपूर्ण डाव हाणून पाडला आहे.