हिंगोली - येथील रामलीला मैदानावर यावर्षी देखील रिंगण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. दरवर्षी संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पायी दिंडीच्या आगमनानिमीत्त रिंगण सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यामध्ये संत नामदेव महाराजांचा मानकरी असलेला अश्व रिंगण घालतो.
हा रिंगण सोहळा म्हणजे हिंगोली करांसाठी एक पर्वणीच असते. अनेक दिवसापासून या रिंगण सोहळ्याची नगरपालिकेच्यावतीने जय्यत तयारी केली जाते. रिंगण सोहळ्यात वयोवृद्ध व्यक्तींसह अगदी पाच ते सात वर्ष वयोगटातील बालके देखील आवर्जून सहभागी होतात.
यावर्षी या रिंगण सोहळ्याची अन पालिकेच्या पोटनिवडणुकीची एकच वेळ आली. त्यामुळेच की काय यंदा रिंगणाची जागा कमी करण्यात आली होती. तसेच दर वर्षीपेक्षा यावर्षी रिंगणामध्ये धावणाऱ्या अश्वांची संख्याही कमी प्रमाणात दिसून आली. मानकरी असलेल्या संत नामदेवाच्या अश्वाने प्रथम रिंगणात फेऱ्या घेतल्या नंतर इतर अश्वानेही फेरे घेण्यास सुरुवात केली. रिंगण सोहळ्यातील भजन कीर्तनाने परिसर दुमदुमून भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नगराध्यक्ष बाबराव बांगर, माजी सभापती रामेश्वर शिंदे यांच्यासह अनेक पुढाऱ्यांनी भजनातील गीतावर ठेका धरला. त्यामुळे रिंगण सोहळा पाहण्यासाठी आलेलेही ठेका धरत असल्याचे पाहावयास मिळाले.
हा सोहळा पाहण्यासाठी येणाऱ्या भावी भक्तांसाठी परिसरात नगरपालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्यासाठी अधिकारी, राजकीय पुढारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला भाविकही तेवढ्याच संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले. नामदेवाचा मानकरी असलेल्या अश्वाची यावेळी महिला भाविकांनी पूजा अर्चा केली.