हिंगोली - जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेती पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. जेमतेम एक दिवस काही प्रमाणात पावसाने दडी धरली होती, मात्र 24 तासाच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे उरले-सुरले पीक हे पाण्यात गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. आज घडीला बऱ्याच शेतकऱ्यांनी कापून टाकलेले सोयाबीन परत गोळा देखील केलेले नाही. शेतातील ही विदारक दृश्य पाहून खरोखरच मन अक्षरशः हेलावून जात आहे.
पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे बऱ्यांच शेतकऱ्यांनी मळणी यंत्रातून सोयाबीन काढून घेण्यासाठी सोयाबीनच्या सूर्या उघडून पाहिले. मात्र बऱ्याच दिवसापासून झाकून ठेवलेल्या सुडीतून गरम वाफ येऊन शेंगांना बुरशी लागल्याचे दिसून आले. तरी ही मोठ्या धीराने मळणी यंत्रातून सोयाबीन काढू पाहतोय मात्र नियमित सुरू असलेल्या पावसामुळे मळणीयंत्र देखील सुडीपर्यंत येत नसल्याचे विदारक चित्र आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आता या निसर्गा समोर पुरता खचला आहे. आता नुकसानीचे पंचनामे नकोत तर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी, एवढीच मागणी आता निसर्गा समोर हतबल झालेल्या बळीराजातूंन केली जात आहे.