हिंगोली - गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या म्हाळशी येथील गणेश गायकवाड नावाच्या व्यक्तीला आंध्र प्रदेशच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. अपहरनकर्ते समजून पोलिसांनाच डांबल्यामुळे ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयाकडे धाव घेऊन त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या म्हाळशी येथील गणेश सीताराम गायकवाड यास पोलीसांनी विचारपूस करून ताब्यात घेतले आणि त्याला मारत चारचाकी वाहनामध्ये टाकले. पोलीस नागरी वेशामध्ये असल्यामुळे ग्रामस्थांना ते अपहरणकर्ते असल्याची शंका आली. ग्रामस्थांनी गाडीला घेराव घालून गणेशची सुटका केली. त्यानंतर पोलिसांना ताब्यात घेत एका खोलीमध्ये डांबून ठेवले.
गोरेगाव पोलीसांनी याप्रकरणी चोकशी केली असता ते आंध्र प्रदेशातील पोलीस असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना मारहाण केल्यामुळे ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले असून त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक न करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
काय प्रकरण?
तेलंगणामध्ये फसवणूक केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्या चार पैकी हिंगोली जिल्ह्यातील एक आरोपी असून तो वाघजाळी येथील आहे. त्यानुसार आरोपीच्या मोबाईल लोकेशनवरून तेलंगणा पोलीस म्हाळशी परिसरात दाखल झाली. त्यावेळी मोबाईल लोकेशन ट्रेस केले असता गणेश समोर आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.