हिंगोली : वाहतूक शाखा पोलिसांच्या तपासणीतून वाचण्यासाठी व उपप्रादेशिक परिवहन विभागाची पासिंग न करता एका दुचाकीस्वाराने शक्कल लढवत चारचाकी गाडीचा नंबर दुचाकीवर टाकला. मात्र, हा त्याचा फंडा वाहतूक शाखा पोलिसांच्या तपासात उघड झाला असून या प्रकाराने सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात रमेश ठोके यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर दिगंबर घुगे रा. अंभेरी ता. जि. हिंगोली, रितेश कमल अवस्थी रा. श्रीनगर हिंगोली, अशी या दोन आरोपींची नावे आहेत.
आरोपी प्रकाश घुगे हा एमडी 62 एमई 5 एक्सबी 1 बी 60478 या क्रमांकाचे इंजिन नंबर असलेल्या दुचाकीने ट्रिपल सीट, विना हेल्मेट अन् विना परवाना शहरातून प्रवास करत असल्याने त्याची दुचाकी जप्त करण्यात आली होती. त्याच्या दुचाकीवरील नंबरची शहानिशा केली असता सदर नंबर हा एका चारचाकी वाहनाचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून त्या चारचाकी वाहनाचा शोध वाहतूक शाखेने घेतला आणि शक्कल लढवली त्यामुळे मोठे बिंगच फुटले.
सदर दुचाकी ही हिंगोली शहरातील श्रीनगर भागातील रितेश कमल अवस्थी याची आहे. त्याने आरटीओ पासिंग न करता तसेच फी न भरता परिवहन विभागाची व शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली. तसेच, ही दुचाकी प्रकाश घुगे या व्यक्तीला विकली. या दुचाकीचे कोणतेही कागदपत्र मालकाकडे नसल्याने त्यानेही पोलिसांपासून वाचण्यासाठी शक्कल लढवल्याचे पोलिसांसमोर कबूल केले. मात्र, वाहतूक शाखेच्या चाणाक्ष नजरेतून आरोपीची ही आयडिया सुटू शकली नाही.
एकंदरीत या प्रकाराने जिल्ह्यात चांगलाच गोंधळ उडाला असून पोलिसांपासून वाचण्यासाठी असाही फंडा वापरणारे आहेत हे या घटनेतून समोर आले आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.