हिंगोली - जवानांचा तणाव कमी व्हावा, यासाठी हिंगोलीतील राज्य राखीव दल येथे नव्याने रुजू झालेले समादेशक मंचक इप्पर यांनी दोन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले व त्या माध्यमातून जवानांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवानांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आठवड्यातील शुक्रवार हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. समादेशक यांच्या या स्तुत्य उपक्रमाने जवानांमध्ये तणावमुक्तीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
हिंगोली येथील राज्य राखीव बल गट क्रमांक 12 मध्ये एकूण एक हजार जवान तैनात आहेत. त्या कर्तव्य बजावताना जवानांवर कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी समादेशक वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. समादेशक इप्पर यांनी सर्वप्रथम जवानांचे दोन वेगवेगळे वाट्सअॅप ग्रुप सुरू केले. त्या ग्रुपमध्ये जवानांनी टाकलेल्या समस्येवर तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. पूर्वी एखाद्या जवानाला काही अडचण आली, तर ती समादेशक यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी आठवडा ओलांडून जायचा. तर कधी कधी पंधरा दिवसाचाही कालावधी लागत असे. अशा स्थितीत जवान कोणतेही टोकाचे पाऊल उचलत असत. ही अडचण लक्षात घेत दोन वाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून समादेशक जवानांच्या संपर्कात राहत आहेत.
जवानांच्या प्रत्येक अडी-अडचणी सोडण्यासाठी समादेशक कटिबद्ध आहेत. एवढेच नव्हे तर इतर ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या जवानांच्या नातेवाइकांचे संपर्कही घेण्यात आले आहे. व त्यामाध्यमातून त्यांना योग्य ती मदत पुरवली जातात. जवानांच्या पाल्यांचा शाळेचा प्रश्न किंवा नातेवाईक आजारी पडले तर त्यांच्या रुग्णालयाची जबाबदारी घेण्यात आली आहे. जवान कर्तव्य बजावून घरी परत येईपर्यंत जवानांचे नातेवाईक संपर्कात ठेवले जातात. तसेच काही जवान व्यसनाधीन होतात. त्यामुळे त्यांना व्यसनाधीनतेच्या बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतल्या जात आहेत. शिवाय वर्षातून तीन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजनही केली जात असल्याचे समादेशक इप्पर यांनी सांगितले.
रक्षाबंधनानिमित्त एका खाजगी इंग्लिश शाळेतील विद्यार्थिनींनी जवानांना राख्या बांधल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनीला भेटीमध्ये वृक्ष देण्यात आले. तसेच राज्य राखीव बल गट परिसरात यंदा 15 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असून ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समादेशक स्वतः जातीने लक्ष घालून आहेत. प्रत्येकाला 15 वृक्ष जोपासण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. प्रत्येक वृक्षाला त्या त्या जवानांच्या नातेवाईकांची नावे दिली जाणार आहेत. वृक्ष जोपासण्यासाठी तीन ते चार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली जाणार आहे. ज्या जवानांवर या वृक्षाची जबाबदारी दिली जाणार आहे, त्या जवानांनी केवळ वृक्षाचीच पाहणी करायची आहे. सर्व वृक्ष हे फळ वर्गीय असणार आहेत.
भविष्यामध्ये 432 नवीन घरांची तरतूद असून जवानांच्या वास्तव्याचाही प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर जवानांच्या पाल्यांच्या शिक्षणाचीही काळजी घेतल्या जाते. एम.बी.बी.एस किंवा अभियांत्रिकी अशा विविध अभ्यासक्रमासाठी पाल्यांची निवड झाल्यास त्यासाठी थेट निधीही दिला जातो. तर राज्य राखीव दल गट परिसरात करण्यात येणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे भविष्यात दोन कोटी लिटर पाणीसाठा जमा होणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी मधुमक्षिकापालन कार्यक्रमही राबविण्यात येणार असल्याचे समादेशक यांनी सांगितले. देशासाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना जराही ताण यायला नको, असा या उपक्रमामागचा उद्देश आहे.