हिंगोली- जिल्ह्यात काही केल्या रेशनचा काळा बाजार थांबायचे नाव घेत नाहीये. वाशिम येथून भरलेला रेशनचा गहू हैदराबाद येथे घेऊन जाताना हिंगोली तालुक्यातील कलगाव येथे हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला. ट्रक ग्रामीण पोलीस ठाण्यात नेऊन तपासणी केली असता, त्यात ४६० पोती रेशनचा गहू असल्याचे आढळून आले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. शेख अब्दुल शेख हैदर (चालक), स. अजीम स. कलीम दोघे अशी आरोपींची नावे आहेत.
वाहनांची तपासणी मोहीम
दोन्ही आरोपी हे वाशिमकडून हैदराबादमार्गे रेशनचा गहू एका ट्रक मध्ये घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती हिंगोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या पथकाने कलगाव शिवारात महामार्गावर थांबून वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली. तर एका ट्रकमध्ये पोत्या मध्ये गहू असल्याचे आढळून आले.
तपासणीत आढळले ४६० गव्हाचे पोते
पोत्यातील गव्हाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता, रेशनचा गहू असल्याचे स्पष्ट झाले. हा गहू वाशिम येथून भरून हैदराबाद येथे नेला जात होता. याआगोदर असा किती वेळा रेशनचा माल चोरून नेला याची चोकशी सुरू आहे. पाच लाख सात हजार ८२८ रूपयाचे गहू तर बारा लाख रुपयांचा ट्रक असा १७ लाख ७ हजार ८२८ रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.